राहूल-प्रियाकांच्या सभांची एकत्रित आकडेवारीही कमीच
नवी दिल्ली : देशातील निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा धुराळा आता शांत झाला आहे. सर्वच दिग्गज नेतेमंडळी प्रचारासाठी उमेदवारांच्या मतदारसंघात तळ ठोकून होते. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघात मतदान होत असून देशभरातील विविध राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळे, देशपातळीवरील नेतेही प्रचारसभांचे दौरे कर आहेत. प्रचारसभांची आकडेवारी पाहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वाधिक सभा घेऊन रेकॉर्ड केला आहे. पहिल्या ३ टप्प्यात मोदींनी तब्बल ८३ सभा घेतल्या आहेत. त्यामुळे, प्रचारसभांच्या रणधुमाळीत मोदींचा पहिला नंबर लागतो.
प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मार्च ते ५ मे या पहिल्या तीन टप्प्यांत ८३ प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमित शाह यांनी ६६ सभा आणि रोड शो केले आहेत. या काळात पंतप्रधान मोदींनी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८३ निवडणूक सभा आणि ‘रोड शो’मध्ये भाग घेतला आहे.
याबाबत भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, मोदींच्या तुलनेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ४० निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी २९ प्रचार सभांमधून जनतेला संबोधित केले आहे.
१४ मे रोजी मोदींचा उमेदवारी अर्ज
३१ मार्च ते ५ मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. ८३ निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. दरम्यान, १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी १३ मे रोजी त्यांच्या विशाल ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे.
शिंदे-पवार वाराणसीला जाणार
मोदी यांच्या उमेदवारीसाठी २५ ते ३० समर्थकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध जाती, जमातींचे लोक आहेत. यांना समर्थक बनवून मोदी हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसून त्यांना सर्व जाती-धर्माचा पाठिंबा मिळत आहे, असा संदेश दिला जाणार आहे.पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते वाराणसीला पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही वाराणसीला जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रचारसभा, ‘रोड शो’ करणारे नेते
- पंतप्रधान नरेंद्र मोदी – ८३
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह – ६६
- काँग्रेस नेते राहुल गांधी – ४०
- प्रियांका गांधी – २९
पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती काँग्रेस देशाला दाखविते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशातील कंधमाल येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, मी भाग्यवान आहे की कंधमालमध्ये येताच मला असे आशीर्वाद मिळाले, जे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. हा आशीर्वाद संपूर्ण देशात होत असलेल्या बदलाचे खरे उदाहरण आहे. २६ वर्षांपूर्वी याच दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. देशभक्तीने ओतप्रोत असलेले सरकार राष्ट्रहितासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी आणि देशातील जनतेला आशा-अपेक्षा देण्यासाठी कसे कार्य करते हे आम्ही दाखवून दिले होते. एक दिवस असा होता जेव्हा भारताने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली होती. दुसरीकडे काँग्रेस आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते आहे. काँग्रेसच्या या कमकुवत वृत्तीमुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांनी ६० वर्षांपासून दहशतीचा सामना केला आहे. देशाला किती दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागला? दहशतवाद्यांना धडा शिकवण्याऐवजी हे लोक दहशतवादी संघटनांच्या बैठका घेत असत, हे देश विसरू शकत नाही. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस या लोकांमध्ये नव्हते का? कारण आम्ही कारवाई केली तर आमची व्होट बँक नाराज होईल, असे काँग्रेस आणि भारत आघाडीला वाटत होते, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.