Quantcast
Channel: Rajesh Sawant – Prahaar.in
Viewing all articles
Browse latest Browse all 812

कोकणचा वाघ लोकसभेत

$
0
0

हा विजय मतदारांना समर्पित – नारायण राणे

रत्नागिरी : देशासह महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात ‘दादांचे’ हे सिद्ध झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जनतेने या मतदारसंघात १० वर्षांनी परिवर्तन घडवत विकासाला साथ देण्याचा निर्णय घेत नारायण राणे यांना विजयी केले आहे. मंगळवारी अन्न महामंडळाच्या वखारीमध्ये झालेल्या मतमोजणीत प्रारंभीपासूनच अखेरच्या फेरीपर्यंत आघाडी घेत राणे यांनी निकटचे प्रतिस्पर्धी उबाठा सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर आघाडी मिळवत धूळ चारली. तब्बल ४० वर्षांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे यांच्या विजयाने कमळ फुलले आहे. आपला हा विजय आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील सर्व मतदारांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी विजयानंतर दिली आहे.

मतमोजणीच्या अखेरच्या २५ व्या फेरीनंतर राणे यांनी ४७ हजार ८५८ मतांनी विनायक राऊत यांचा पराभव करीत विजयाचा गुलाल उधळला. या निवडणुकीत नारायण राणे यांना ४ लाख ४८ हजार ५१४ तर राऊत यांना ४ लाख ६५६ मते मिळाली. या विजयानंतर भाजपा महायुतीच्या कार्यर्त्यांनी एकच जल्लोष केला. नारायण राणे यांच्या विजयाने कोकणला फक्त विकास हवा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान झाल्यानंतर नारायण राणे यांचा विजय निश्चित मानला जात होता. लीड किती मिळेल, यावर अनेक ठिकाणी पैजाही लागल्या होत्या. मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला मिरजोळे एमआयडीसी येथे अन्न महामंडळाच्या वखारीमध्ये सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून नारायण राणे यांनी मतांची आघाडी घेतली. आकडेवारी कमी-जास्त झाली तरीही किरकोळ अपवाद वगळता नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर आघाडी मिळवत दणदणीत विजय मिळवला.

या मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांनी मतदानाच्या दोन महिने आधीपासूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली होती. तर नारायण राणे यांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला होता. मात्र असे असतानाही गेल्या ४० वर्षातील नारायण राणे यांची विकासाची भूमिका, महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अखंड परिश्रम आणि मतदारांनी विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने नारायण राणे यांचा विजय झाला.

एक एक फेरीनिहाय नारायण राणे यांची आघाडी वाढत असताना मतमोजणी नजीकच्या भाजपाच्या पेंडोलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. उमेदवार असलेले नारायण राणे हे सकाळपासूनच मतमोजणीच्या स्थळी उपस्थित होते तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सौ. नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार राजन तेली, माजी आ. सदानंद चव्हाण, आदिंसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभीपासूनच राणे यांनी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातून भाजपा कार्यकर्ते आणि राणे परिवार प्रेमी मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झाले. ढोल-ताशे, गुलाल, फटाके यांच्या आवाजाने मिरजोळे एमआयडीसी परिसर दणाणून गेला होता.

नारायण राणे यांनी घेतले सपत्नीक गणपतीपुळेत ‘श्रीं’चे दर्शन

मंगळवारी मतमोजणीपूर्वी सकाळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे व कुटुंबीयांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे ‘श्रीं’चे मनोभावे दर्शन घेत विजयासाठी आशीर्वाद घेतले.

हा विजय मतदारांना समर्पित

विजयानंतर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपला हा विजय आपण समस्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांना समर्पित करीत असल्याची भावना व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने कायमचं आपल्याला प्रेम आणि आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळेचे आजपर्यंत आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीचं मुक्त होऊ शकत नाही. या निवडणुकीत देखील सिंधुदुर्गवासीयांनी मतदानाच्या रुपाने भरभरून दिलेल्या आशीर्वादाने आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

मनसेने वाटले पेढे

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे हे विजयी झाल्यानंतर मनसेच्या शहर कार्यकारिणीच्या वतीने शहरवासीयांना पेढे वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कणकवलीतील प्रचार सभेमध्ये राणे यांच्या विजयाची ग्वाही दिली होती.

सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार नारायण राणे; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयी घोषित

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आज झालेल्या मतमोजणीत नारायण तातू राणे यांना सर्वाधिक म्हणजेच ४ लाख ४८ हजार ५१४ मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी त्यांना विजयी घोषित करुन प्रमाणपत्र दिले.


Viewing all articles
Browse latest Browse all 812

Trending Articles





<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>